आजारांची माहिती

मुतखडा कारणे, लक्षणे, घरगुती उपाय, आहार, ऑपरेशन, Kidney Stone in Marathi

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

मुतखड्याचा आजार ( Kidney Stone in Marathi ) हा पुष्कळ लोकामध्ये दिसून येणारा किडणीचा एक महत्त्वपूर्ण रोग आहे. मुतखड्यामुळे असह्य वेदना, लघवीचा संसर्ग आणि किडणीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळेच मुतखड्याबद्दल तसेच तो होऊ नये यासाठी उपाय जाणून घेणे गरजेचे आहे.

अनुक्रमणिका

मुतखडा म्हणजे काय ?

लघवीत कॅल्शियम ऑक्झलेट किंवा इतर क्षारकण ( Crystals ) एकमेकांच्यात मिसळल्यानंतर काही काळानंतर हळूहळू मूत्रमार्गात कठीण पदार्थ तयार व्हायला लागतात त्यालाच मुतखडा ( Kidney Stone in Marathi ) असे म्हणतात.

मुतखडा आकार – कसा दिसतो, तो मूत्रमार्गात कुठे दिसू शकतो ?

  • मूत्रमार्गात होणारा मुतखडा वेगवेगळ्या लांबीचा आणि वेगवेगळ्या आकाराचा असतो. हा रेतीच्या कणाएवढा छोटा किंवा चेंडूएवढा मोठाही असू शकतो . काही मुतखडे गोल किंवा अंडाकार आणि बाहेरून नरम असतात. अशा प्रकारच्या खड्यांमुळे कमी वेदना होतात आणि ते सहजपणे नैसर्गिकरित्या लघवीबरोबर बाहेर पडून जातात.
  • काही खडे ओबडधोबड असतात , ज्यामुळे खूप वेदना होतात आणि ते सहजपणे लघवीबरोबर बाहेर पडत नाहीत . मुतखडा सामान्यत : किडणी , मूत्रवाहिनी आणि मूत्राशयात दिसून येतो.

मुतखडा होण्याची मुख्य कारणे कोणती ?

काही व्यक्तींत विशेष करून मुतखडा का दिसून येतो ? मुतखडा होण्याची मुख्य कारणे कोणती ?

साधारणत: आपल्या लघवीत असलेले काही खास रासायनिक पदार्थ, क्षारकण एकमेकांत मिसळण्यास रोखतात, त्यामुळे मुतखडा बनत नाही. मूत्रमार्गातील मुतखडापोटातील असह्य वेदनेचे मुख्य कारण असते.

मात्र अनेक जणांमध्ये पुढील कारणांमुळे मुतखडा तयार होण्याची शक्यता असते:-

  • पाणी कमी पिण्याची सवय.
  • अनुवंशिकतेमुळे मुतखडा होण्याची शक्यता .
  • मूत्रमार्गात वारंवार संसर्ग होणे .
  • मूत्रमार्गात अडथळा असणे .
  • व्हीटॅमिन सी किंवा कॅल्शियम असलेल्या औषधांचे अधिक सेवन करणे .
  • दीर्घकाळ अंथरुणावर पडून राहाणे .
  • हायपरपॅराथायरॉइडिझमचा त्रास असणे .

मुतखड्याची लक्षणे :-

  • सर्वसामान्यपणे मुतखड्याचा आजार ३० ते ४० वर्ष वयोगटात आणि महिलांच्या तुलनेत पुरुषांच्यात ३ ते ४ टक्के अधिक दिसून येतो.
  • अनेक वेळा मुतखड्याचे निदान अचानक होते . ज्या रोग्यांमध्ये मुतखड्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्याना ‘ सायलेंट स्टोन असे म्हणतात.
  • पाठ आणि पोटात सतत वेदना होतात.
  • उलटी येते , मळमळ होते. लघवीच्या वेळी जळजळ होते.
  • लघवीतून रक्त जाते.
  • लघवीत वारंवार संसर्ग होतो.
  • लघवी होणे अचानक बंद होते.

मुतखड्यांच्या वेदनांची विशिष्ट लक्षणे :-

  • ह्या वेदना खड्याचे स्थान, आकार, प्रकार आणि लांबी – रुंदीवर अवलंबून असतात.
  • पोटात दुखण्याबरोबरच लाल लघवी होण्याचे मुख्य कारण मुतखडा होय.
  • मुतखड्याची वेदना अचानक सुरू होते. ह्या वेदनेमुळे डोळ्यासमोर तारे चमकू लागतात इतकी ती असह्य असते.
  • किडणीतील मुतखड्याची वेदना कमरेपासून सुरू होऊन जांघेकडे जाते.
  • मूत्राशयातील खड्यामुळे जांघ आणि लघवीच्या ठिकाणी वेदना होतात .
  • ही वेदना चालण्या – फिरण्याने किंवा खडबडीत रस्त्यावर वाहनातून प्रवास करताना लागणाऱ्या धक्क्यांमुळे अधिक वाढते .
  • ही वेदना साधारणत : अनेक तास राहते , नंतर आपणहून कमी होते .
  • बहुतेक वेळा ही वेदना अधिक झाल्यामुळे रोग्याला डॉक्टरकडे जावेच लागते आणि वेदना कमी करण्यासाठी औषध किंवा इंजेक्शनची गरज लागते .

मुतखड्यामुळे किडणी खराब होऊ शकते का ?

  • होय . अनेक रोग्यांमध्ये मुतखडा गोल, अंडाकार आणि चिकट असतो. बहुधा अशा खड्याची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत . असा खडा मूत्रमार्गात अडथळा निर्माण करू शकतो. ज्यामुळे किडणीत तयार झालेली लघवी मूत्रमार्गातून सरळ जाऊ शकत नाही आणि त्यामुळे किडणी फुगते .
  • जर या खड्यावर योग्यवेळी योग्य उपचार झाले नाहीत, तर दीर्घकाळ फुगून राहिलेली किडणी हळूहळू कमजोर होऊ लागते आणि नंतर काम करणे पूर्ण बंद करते. अशाप्रकारे किडणी खराब झाल्यानंतर जरी मुतखडा बाहेर काढला तरी किडणी पुन्हा पूर्णपणे काम करेलच याची शक्यता कमी असते.
  • वेदनारहित मुतखड्यामुळे किडणी खराब होण्याची भीती अधिक असते.

मूत्रमार्गातील मुतखड्याचे निदान :-

  • मूत्रमार्गाची सोनोग्राफी आणि पोटाच्या एक्स – रे च्या मदतीने ह्या खड्याचे निदान केले जाते .
  • आय.वी.पी. ( Intravenous Pyelography in Marathi ) ची तपासणी : साधारणपणे ही तपासणी निदानासाठी आणि ऑपरेशन किंवा दूर्बिणीद्वारे उपचार करण्यापूर्वी केली जाते .
  • ह्या तपासणीत खड्याची लांबी – रुंदी , आकार आणि स्थानाबाबत योग्य माहिती मिळते , शिवाय किडणीची कार्यक्षमता किती आहे आणि किडणी किती फुगली आहे ह्याबद्दलची देखील माहिती मिळते.
  • लघवी आणि रक्ताच्या तपासणीद्वारे लघवीतील संसर्ग आणि त्याची तीव्रता तसेच किडणीच्या कार्यक्षमतेबद्दलही माहिती मिळते.

मूत्रमार्गाच्या मुतखड्यावरील उपचार :-

खड्यासाठी कुठला उपचार गरजेचा आहे, हे खड्याची लांबी , त्याचे स्थान , त्यामुळे होणारा त्रास आणि धोका ध्यानात घेऊन निश्चित केले जाते . हा उपचार दोन भागांत विभागता येईल .

  • १ ) औषधाद्वारे उपचार ( conservative medical treatment )
  • २ ) मूत्रमार्गातून खडा काढण्याचे विशिष्ट उपचार ( operation , दुर्बिण आणि लिथोट्रिप्सी वगैरे )

१ ) औषधाद्वारे उपचार :-

५० टक्वयांहून अधिक रुग्णांत खड्याचा आकार छोटा असतो . जो नैसर्गिकरित्या ३ ते ६ आठवड्यात आपणहूनच लघवीबरोबर निघून जातो. ह्या काळात रोग्याला वेदनांपासून आराम मिळण्याकरता आणि खडा लवकर निघण्यासाठी सहाय्यक अशी औषधे दिली जातात.

सोनोग्राफी आणिएक्स – रे मुतखड्याच्या निदानाच्या मुख्य तपासण्या आहेत.

अ ) औषधे आणि इंजेक्शने :-

मुतखड्यामुळे होणारी असह्य वेदना कमी करण्याकरिता त्वरित तसेच दीर्घकाळासाठी परिणामकारक वेदनाशामक गोळ्या आणि इंजेक्शने दिली जातात .

ब ) जास्त पाणी :-

वेदना कमी झाल्यानंतर रोग्याला जास्त प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो . जास्त द्रवपदार्थ घेतल्याने लघवी अधिक होते आणि त्यासोबत खडा निघून जायला मदत होते . जर उलटी होत असल्याने पाणी पिणे शक्य नसेल तर अशा काही रोग्यांना शिरेतून बाटलीद्वारे ग्लुकोज चढवले जाते .

क ) लघवीतील संसर्गावरील उपचार :-

मुतखड्याच्या अनेक रोग्यांमध्ये लघवीचा संसर्गही दिसून येतो , ज्यावर अँटीबायोटिक्सद्वारे उपचार केले जातात .

२ ) मूत्रमार्गातून मुतखडा काढण्याचे विशिष्ट उपचार :-

जर नैसर्गिकरीत्या खडा निघत नसेल, तर तो काढण्याचे अनेक पर्याय आहेत . खड्याचा आकार , स्थान आणि प्रकार लक्षात घेऊन कुठली पद्धत उत्तम आहे हे युरोलॉजिस्ट किंवा सर्जन ठरवतात.

प्रत्येक मुतखडा त्वरित काढणे गरजेचे असते का ?

नाही . जर खड्यांमुळे वारंवार वेदना , लघवीत संसर्ग , लघवीतून रक्त जाणे , मूत्रमार्गात अडथळा किंवा किडणी खराब होत नसेल तर असे खडे त्वरित काढण्याची आवश्यकता नसते . डॉक्टर अशा खड्यांवर योग्य लक्ष ठेवून ते केव्हा आणि कशा प्रकारच्या उपचारांनी काढणे योग्य ठरेल याचा सल्ला देतात .

मुतखड्यामुळे मूत्रमार्गात अडथळा येत असेल, लघवीतून वारंवार रक्त वा पू जात असेल वा किडणीचे नुकसान होत असेल , तर असा खडा त्वरित काढणे गरजेचे असते .

छोटा मुतखडा जास्त पाणी प्यायल्याने नैसर्गिकरित्या आपणहून लघवीद्वारे निघून जातो .

अ) लिथोट्रीप्सी ( ESWL – Extra Corporeal Shock wave Lithotripsy in Marathi )

  • किडणी आणि मूत्रवाहिनीच्या वरील भागात असणारा मुतखडा काढण्याची ही आधुनिक पद्धत आहे .
  • या पद्धतीत खास प्रकारच्या लिथोट्रीप्टर मशीनच्या सहाय्याने निर्माण केलेल्या शक्तिशाली तरंगांच्या ( शॉक वेब्ज ) मदतीने खड्याचा रेतीसारखा चुरा केला जातो , जो काही दिवसात हळूहळू लघवीद्वारे बाहेर पडतो .

लिथोट्रीप्सी चे फायदे :-

  1. सर्वसाधारणपणे रोग्याला रुग्णालयात भरती करण्याची गरज नसते .
  2. ऑपरेशन किंवा दुर्बिणीशिवाय , रोग्याला बेशुद्ध न करता मुतखडा काढला जातो .

लिथोट्रीप्सी चे तोटे :-

  1. सर्व प्रकारच्या आणि मोठ्या मुतखड्यांसाठी ही पद्धत परिणामकारक नाही.
  2. खडा काढून टाकण्यासाठी अनेकदा एकापेक्षा जास्तवेळा हा उपचार करावा लागतो.
  3. खडा निघून जाण्याबरोबरच वेदना किंवा अनेकदा लघवीत संसर्गही होऊ शकतो.
  4. मोठ्या खड्यांवरील उपचारांमध्ये दुर्बिणीच्या मदतीने किडणी आणि मूत्राशयाच्यामध्ये विशेष प्रकारची नळी ( D. J. STENT ) वण्याची गरज पडते.

लिथोट्रिप्सी ही ऑपरेशनशिवाय मुतखडा काढण्याची आधुनिक आणि प्रभावी पद्धत आहे.

ब ) किडणीतील मुतखड्यावर दुर्बिणीद्वारे उपचार ( PCNL / Per Cutaneous Nephro Lithotripsy ) :-

  • किडणीमधील खडा जेव्हा एक सेमी पेक्षा मोठा असतो, तेव्हा तो काढण्याची ही आधुनिक आणि परिणामकारक पद्धत आहे .
  • ह्या पद्धतीत कमरेवर किडणीच्या बाजूला एक छोटी चीर पाडली जाते . त्यातून किडणीपर्यंतचा मार्ग तयार केला जातो . ह्या मार्गातून किडणीत जिथे खडा असतो तिथपर्यंत एक नळी घातली जाते .
  • ह्या नळीतून खडा दिसू शकतो . छोटा खडा चिमट्याच्या मदतीने तर मोठ्या खड्याचा शक्तिशाली तरंगांद्वारे ( Shock Waves ) चुरा करून तो बाहेर काढला जातो .

किडणीतील मुतखड्यावर दुर्बिणीद्वारे उपचार फायदे :-

सामान्यपणे पोट फाडून केल्या जाणाऱ्या मुतखड्यावरील ऑपरेशनमध्ये पाठ आणि पोटाच्या भागात १२ ते १५ सेंमी लांब चीर पाडावी लागते . पण वर नमूद केलेल्या ह्या आधुनिक पद्धतीत केवळ १ सेमी छोटी चीर कमरेवर पाडली जाते . त्यामुळे ऑपरेशननंतर रोगी काही काळातच आपला पूर्वीचा दिनक्रम आचरू शकतो .

क ) मूत्राशय आणि मूत्रवाहिनीत असलेल्या मुतखड्यावर दुर्बिणीच्या मदतीने उपचार :-

मूत्राशय आणि मूत्रवाहिनीत असलेल्या खड्यावरील उपचारासाठी ही उत्तम पद्धत आहे . ह्या पद्धतीत ऑपरेशन किंवा चीर न पाडता लघवीच्या मार्गातून ( मूत्रनलिका ) विशेष प्रकारच्या दुर्बिणीच्या ( Cystoscope आणि Ureteroscope ) मदतीने खड्यापर्यंत पोहचता येते आणि खड्याला “ शॉकवेव्ह प्रोब ” द्वारे छोट्या कणात तोडून दूर केले जाते .

दुर्बिणीद्वारे केल्या जाणाऱ्या उपचारात मुतखड्याला ऑपरेशनशिवाय काढता येते .

ड ) मुतखडा ऑपरेशन :-

मुतखडा जेव्हा मोठा असेल आणि वरील उपचारांनी तो सहज काढणे शक्य नसेल तेव्हा तो शस्त्रक्रियेद्वारे काढला जातो .

मुतखडा होऊ न देणे टाळणे :-

मुतखडाएकदा नैसर्गिक रूपात किंवा उपचारांद्वारे निघून गेल्यानंतर या आजारापासून संपूर्णपणे मुक्ती मिळते का ?

नाही . ज्या रोग्याला एकदा मुतखडा झाला असेल त्याला पुन्हा तो होण्याची शक्यता ८० % असते . त्यामुळे प्रत्येक रोग्याने सावध राहणे गरजेचे असते.

पुन्हा मुतखडा होऊ नये म्हणून रोग्याने कुठली काळजी घ्यावी आणि पथ्य पाळावे ?

मुतखड्याच्या आजारात आहारनियंत्रण विशेष महत्वाचे आहे . पुन्हा मुतखडा होऊ नये अशी इच्छा बाळगणाऱ्या रोग्यांनी पुढील सल्ल्यांचे लक्षपूर्वक पालन केले पाहिजे .

१) जास्त प्रमाणात पाणी पिणे :-

  • तीन लीटर किंवा १२ ते १४ ग्लासांपेक्षा जास्त प्रमाणात पाणी आणि द्रवपदार्थ दररोज घेतले पाहिजेत . हा मुतखडा बनणे थांबवण्याचा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे .
  • खडा बनणे थांबवण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या किवा द्रवाच्या प्रकारांपेक्षा दररोज घेतले जाणारे एकूण प्रमाण अधिक महत्त्वपूर्ण आहे .
  • मुतखडा बनणे थांबवण्यासाठी किती पाणी प्यायले , यापेक्षा किती प्रमाणात लघवी झाली आहे , हे अधिक महत्त्वाचे आहे . दररोज २ लीटरपेक्षा जास्त लघवी होईल एवढे पाणी पिणे जास्त गरजेचे आहे .

जास्त पाणी पिणे मुतखड्यावरील उपचारासाठी आणि तो पुन्हा होऊ नये हे टाळण्यासाठी खूप गरजेचे आहे .

  • पूर्ण दिवस पाण्याएवढी स्वच्छ लघवी होत असेल , तर ह्याचा अर्थ पुरेशा प्रमाणात पाणी प्यायले आहे असा होतो . पिवळ्या रंगाची दाट लघवी होणे हे पाणी कमी प्रमाणात प्यायल्याचे लक्षण आहे .
  • पाण्याशिवाय नारळपाणी , जवाचे पाणी , सर्वात पातळ ताक , बिनमिठाचा सोडा , लेमन ह्यासारखे इतर द्रवपदार्थ जास्त घेतले पाहिजेत .
  • दिवसाच्या ज्या विशिष्ट वेळेत लघवी कमी आणि दाट पिवळी बनते त्यावेळी लघवीत क्षारांचे प्रमाण जास्त होत असल्याने मुतखडा बनण्याची प्रक्रिया खूप लवकर सुरू होते . ती थांबवणे अत्यंत गरजेचे आहे .
  • मुतखडा बनण्याचे थांबवण्यासाठी , न विसरता , जेवण झाल्यानंतरच्या तीन तासांदरम्यान , जास्त श्रम पडणारे काम केल्यानंतर त्वरित आणि रात्री झोपण्यापूर्वी तसेच मध्यरात्री उठून दोन ग्लास किंवा अधिक पाणी पिणे महत्त्वाचे आहे . अशा प्रकारे दिवसाच्या ज्या वेळेत मुतखडा बनण्याचा धोका अधिक असेल , त्यावेळी जास्त पाणी आणि तरल पदार्थ पिण्यामुळे पातळ , साफ आणि जास्त प्रमाणात लघवी बनते . त्यामुळे मुतखडा होणे टाळता येते .

२ ) आहार नियंत्रण :-

  • मुतखड्याचे प्रकार लक्षात घेऊन खाण्यात पूर्ण दक्षता आणि पथ्य पाळल्यास मुतखडा होणे थांबवण्यात मदत मिळू शकते .
  • जेवणात मीठ कमी घेणे तसेच खारट पदार्थ , पापड , लोणची यांसारखे जास्त मीठ असलेले खाद्यपदार्थ खाता कामा नयेत .
  • पूर्ण दिवस पाण्यासारखी स्वच्छ लघवी होणे हा पुरेशा प्रमाणात पाणी प्यायले जात असल्याचा पुरावा आहे .
  • लिंबूपाणी , नारळपाणी , मोसंबीचा रस , अननसाचा रस , गाजर , कारले , बिया काढून घेतलेल्या टोमॅटोचा रस , केळी , जवस , बदाम इत्यादीचे सेवन मुतखडा न होण्यास मदत करतात . म्हणून त्यांचे प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला दिला जातो .
  • मुतखड्याच्या रोग्यांनी दुधाच्या पदार्थाचे ( जे जास्त प्रमाणात कॅल्शियमयुक्त असतात ) सेवन करता कामा नये , ही समजूत चुकीची आहे . खाण्यात योग्य प्रमाणात घेतलेला कॅल्शियम त्या खाद्य पदार्थाच्या ऑविझलेट बरोबर जोडला जातो . यामुळे ऑविझलेटचे शोषण कमी होते आणि मुतखडा होण्यापासून अटकाव होतो .
  • विटॅमिन सी जास्त प्रमाणात ( ४ ग्रॅम हून अधिक ) घेऊ नये

ऑक्झिलेटवाल्या मुतखड्यासाठीचे पथ्य :-

खाली दिलेले ऑविझलेटयुक्त खाद्य पदार्थ कमी खावेत .

  • भाज्या – टोमॅटो , भेडी , वांगी , काकडी , पालक , चवळी
  • फळे – चिकू , आवळे , द्राक्ष , स्ट्रॉबेरी , काजू
  • द्रवपदार्थ – कडक चहा , द्राक्षाचा रस , कॅडबरी , कोको , चॉकलेट , थम्सअप , पेप्सी , कोका कोला

युरिक अॅसिड मुतखड्यासाठी पथ्य :-

ज्यामुळे युरिक अॅसीड वाढू शकते असे पुढील खाद्यपदार्थ अत्यंत कमी प्रमाणात खावेत .

  • ब्रेड , होल व्हीट ब्रेड
  • डाळी , मसूर डाळ
  • भाज्या – फ्लॉवर , वांगी , पालक , मशरुम
  • फळे – चिकू , सिताफळ .
  • मांसाहार – मांस , कोंबडी , मासे , अंडी
  • बीयर , दारू

९० % रोग्यांना मुतखडा पुन्हा होऊ शकतो , म्हणून नेहमी पथ्य पाळणे व सल्ल्यानुसार तपासणी करून घेणे आवश्यक असते .

३ ) औषधाने उपचार :-

  • ज्या रोग्यांच्या लघवीत कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते अशा रोग्यांना थायझाइड्स आणि सायट्रेटचे प्रमाण असलेली औषधे दिली जातात .
  • युरिक अॅसीडवाल्या मुतखड्याच्या रोगात अॅलोप्यूरीनॉल ( Allopurinol ) आणि लघवीला क्षारयुक्त बनवणारी औषधे घेण्याचा सल्ला दिला जातो .

४ ) नियमित तपासणी :-

मुतखडा स्वतःहून पडल्यास किंवा उपचारांनी काढल्यानंतरही पुन्हा होण्याची भीती बहुतांशी रोग्यात असते आणि काही रोग्यांना मुतखडा असूनही त्याची लक्षणे दिसत नाहीत किंवा ती न दिसण्यासारखी असतात . म्हणूनच कुठल्याही प्रकारचा त्रास होत नसला तरी , डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रत्येक वर्षी सोनोग्राफी करून घेणं आवश्यक आहे. सोनोग्राफीमध्ये मुतखडा नसल्याची खात्री करता येते किंवा प्राथमिक अवस्थेत त्याचे निदान होऊ शकते .

मुतखड्याची लक्षणे लक्षात घेऊन योग्य औषधे घेतल्यास मुतखडा होणे टाळू शकतो.

Kidney in Marathi
Copyright Material Don't Copy © 2021

Recent Posts

जागतिक आरोग्य दिन २०२४ – माझे आरोग्य, माझे हक्क

जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो.… Read More

01/04/2024

राष्ट्रीय जंतनाशक दिन २०२४ प्रश्न उत्तरे Deworming day FAQ in Marathi

सन २०२३ - २०२४ राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ (मॉप… Read More

11/01/2024

गरोदरपणातील मधुमेह GDM in Marathi

गरोदरपणातील मधुमेह (GDM) म्हणजे काय? Gestational diabetes in Marathi :- गर्भधारणेदरम्यान जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण… Read More

07/01/2024

पोटातील जंत सर्व माहिती Roundworm Tapeworm Worm Meaning in Marathi

जंत ( Worm in Marathi ) होणे ही आपल्या देशातली महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात… Read More

05/01/2024

उष्माघात कारणे लक्षणे प्रतिबंध उपचार Heat Stroke Meaning in Marathi

उष्माघात कारणे, उष्माघात लक्षणे, उष्माघात प्रतिबंध, उष्माघात उपचार, उष्माघात घरगुती उपाय, मराठी माहिती, Heat Stroke… Read More

19/03/2023