हायड्रोक्सीक्लोरोक्वीन व कोरोना हे काही दिवसांपासून वादात आहेत. खालील लेखात हायड्रोक्सीक्लोरोक्वीन व कोरोना, ट्रम्प आणि मोदी, भारत हा सर्वात मोठा सप्लायर, फार्मसी कंपन्यांसाठी शाप, फार्मसी कंपन्यांची धूर्तपणा, द लांसेट चा तो खोटा प्रबंध, खोटा प्रबंध मागे घेतला, तसेच भारतीय ICMR हिरो ठरले ईत्यादि सर्व माहिती दिलेली आहे.
अनुक्रमणिका
हायड्रोक्सीक्लोरोक्वीन ट्रम्प आणि मोदी:-
Hydroxychloroquine Trump and Modi in marathi:-
काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधासाठी भारताला धमकी दिली आणि भारताने घाबरून लगेच औषध सप्लाय केले अशा बातम्या आल्या होत्या.
खरेतर ट्रम्प यांनी धमकी दिलीच नव्हती, पूर्ण प्रेस कॉन्फरन्स न पाहता फक्त तेवढी क्लिप पाहील्याने आपल्याकडे लगेच त्यांनी धमकी दिल्याचा आणि त्या धमकीमुळे ५६ इंची छाती फाटल्याचा उद्धार झाला होता.
हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा भारत हा सर्वात मोठा सप्लायर:-
तर हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा भारत हा सर्वात मोठा सप्लायर असल्याने कोविड-19 साठी (त्याला करोना म्हणू तेच बरे वाटते) भारत हा जगाचा आधारस्तंभ ठरला. हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे अतिशय स्वस्त औषध आहे, त्यामुळे ते जर करोनावर प्रभावी ठरले तर सगळ्या जगासाठी ते एक वरदान ठरणार होते.
हायड्रोक्सीक्लोरोक्वीन फार्मसी कंपन्यांसाठी शाप:-
पण जे जगासाठी वरदान ठरते ते अनेक फार्मसी कंपन्यांसाठी शाप ठरू शकते. कारण जर समजा हायड्रोक्सीक्लोरोक्वीन करोनासाठी ५० टक्केच काम करत असले, आणि एक नवे औषध शोधले जे ७०-८० टक्के काम करत असेल, तरीही कमी किंमतीमुळे हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच जास्त वापरले जाणार.
त्यामुळे नव्या औषधाची किंमत अव्वाच्या सव्वा लावता येणार नाही, कारण ती तशी लावली तर कमी प्रभावी का होईना, पण पर्याय उपलब्ध असल्याने खूप जास्त किंमत असलेले औषध कोणीही विकत घेणार नाही.
फार्मसी कंपन्यांची धूर्तपणा:-
मग यासाठी करावे काय? जसे लेटेस्ट नेत्याला हिरो बनविण्यासाठी ओल्डेस्ट नेत्याला व्हिलन बनवावे लागते, तसे हायड्रोक्सीक्लोरोक्वीनला व्हिलन बनवले तरच नवे औषध हिरो बनेल आणि त्याला पाहीजे त्या अव्वाच्या सव्वा किंमतीत विकता येईल.
ही झाली पार्श्वभूमी फ्रांस, ऑस्ट्रेलिया या देशांतून हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे करोनावर प्रभावी आहे असे सांगणारे काही प्रबंध पब्लिश झाले, पण या प्रबंधांत अभ्यासली गेलेली रुग्णांची संख्या २०-३० अशी खूप कमी होती.
त्यामुळे त्यावरून हे औषध खरेच प्रभावी आहे असा निष्कर्ष काढणे तेवढेसे योग्य नव्हते. रुग्ण संख्या किमान काही हजार किंवा त्याहून अधिक असेल तर त्या निष्कर्षाला ठोस मानले जाऊ शकते. पण एवढ्या मोठ्या रुग्णसंख्येचा डेटा कुठेही उपलब्ध नव्हता. काही प्रबंध असेही प्रकाशित झाले की हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे प्लेसिबो इफेक्ट पेक्षा काही अधिक उपयोगी नाही.
भारत सरकार आणि WHO ची हायड्रोक्सीक्लोरोक्वीन वापरास परवानगी:-
दरम्यान भारतात आणि जगभरात अनेक देशांत हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा प्रतिबंधक औषध म्हणून वापर चालूच होता. WHO ने सुद्धा त्याच्या औषध म्हणून वापरायच्या ट्रायल्स ला परवानगी दिली होती. भारतात ICMR ने नुकतेच सुधारीत गाईडलाईन्सद्वारे हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे अभ्यासात प्रभावी आढळले असून त्याचा प्रतिबंधक औषध म्हणून वापर करण्यासाठी परिपत्रक जारी केले होते.
द लांसेट चा तो खोटा प्रबंध:-
अशाच वेळी द लांसेट या वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित पत्रिकेत २२ मे ला एक प्रबंध प्रकाशित झाला ज्यात हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे करोनासाठी उपयोगी असणे सोडा, ते घेतल्याने उलट मृत्युदर वाढतो असे जाहीर केले गेले होते.
विशेष म्हणजे हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे खूप जुने औषध असूनही पूर्वी कधी त्याच्या इतक्या दुष्परिणामांचा कुठेही उल्लेख झालेला नव्हता. मात्र लांसेट हे इतके प्रतिष्ठित जर्नल आहे की या प्रबंधाने जग शॉक झाले.
बरे या प्रबंधांत थोडे थोडके नाही तर संपूर्ण जगातील तब्बल ६७१ हॉस्पिटल्समधील ९६ हजारांहून अधिक पेशंट्सचा अभ्यास करण्यात आल्याचा दावा होता. इतक्या अधिक पेशंट्सचा डेटा असल्यावर त्यावर विश्वास ‘न’ ठेवणे मूर्खपणा झाला असता.
झाले, त्वरित जगभरातील कित्येक देशांनी हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा वापर थांबवला. स्वतः WHO ने देखील हायड्रोक्सीक्लोरोक्वीन वर आधारित सर्व ट्रायल्स थांबविण्याचे निर्देश दिले. पण भारतात ICMR मात्र हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या वापरावर ठाम होते.
ICMR मात्र हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या वापरावर ठाम:-
स्वतः WHO ने देखील हायड्रोक्सीक्लोरोक्वीन वर आधारित सर्व ट्रायल्स थांबविण्याचे निर्देश दिले. पण भारतात ICMR मात्र हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या वापरावर ठाम होते.
जगभरातील लोकांनी, आणि अगदी WHO ने सुद्धा दुष्परिणाम आहेत म्हणून बंदी घातलेले हे औषध भारतात मात्र सर्रास दिले जात आहे, हे लोकांना आवडले नव्हते.
द लांसेट च्या त्या प्रबंधाचे लेखक वादात:-
दरम्यान लांसेट मध्ये प्रकाशित झालेल्या या प्रबंधाचे लेखक होते मनदीप मेहरा, सपन देसाई, फ्रॅंक रशीझका, आणि अमित पटेल. यातील तीन लोक भारतीय वंशाचे आहेत (भारतीय नव्हे).
यातील सपन देसाई या माणसाची सर्जीस्फिअर नावाची एक कंपनी आहे त्या कंपनीनेच जगभरातून हा डेटा मिळवला आहे असे सांगण्यात आले होते.
मात्र हा प्रबंध प्रकाशित झाल्यावर लगेच अनेक सायंटिफिक डिस्कशन फोरममध्ये कुजबुज चालू झाली, आणि सर्जीस्फिअरच्या डेटा मध्ये काही चुका आहेत असे लोक म्हणू लागले.
ऑस्ट्रेलियातील गार्डीयन ने केले डेटाचे क्रॉसचेकिंग:-
ऑस्ट्रेलियातील गार्डीयन या वृत्तपत्राने ऑस्ट्रेलियाच्या डेटाचे क्रॉसचेकिंग केले असता त्यात गडबड आढळली. ऑस्ट्रेलियात मरण पावलेल्या लोकांपेक्षा जास्त लोक मरण पावल्याचे प्रबंधांत दाखवण्यात आले होते.
यावर सपन देसाई याने चुकून एका एशियन हॉस्पिटलचा डेटा ऑस्ट्रेलियात जोडला गेला असे सांगून ते प्रकरण मिटवले.
पण त्या वृत्तसंस्थेने ऑस्ट्रेलियातील करोनाचा इलाज करणाऱ्या पाच प्रमुख हॉस्पिटलमध्ये चौकशी केली असता या हॉस्पिटल्सनी सर्जीस्फिअर नावाच्या कोणत्याही कंपनीचे नावही ऐकले नसल्याचे व कोणतेहि संशोधन त्यांच्याकडे झालेले नसल्याचे स्पष्ट केले.
तसेच आम्ही कोणालाही काहीही डेटा दिला नसल्याचे सांगितले. आता मात्र सर्जीस्फिअर संशयाच्या घेऱ्यात आली.
द सायंटिस्ट या पोर्टलनेही सर्जीस्फिअर या कंपनीची पाळेमुळे शोधली:-
द सायंटिस्ट या पोर्टलनेही सर्जीस्फिअर या कंपनीची पाळेमुळे शोधली असता त्यांना अनेक धक्कादायक बाबी कळल्या. या कंपनीत फक्त ११ माणसे काम करतात, त्यात सायंटिफिक पोस्टवरील मुख्य व्यक्ती ही कुणी सायंटिस्ट नसून सायन्स फिक्शन लिहिणारी व्यक्ती आहे असे समजले.
कंपनीच्या एका अन्य महत्वाच्या पोस्टवरील व्यक्तीचाही त्या क्षेत्राशी संबंध नसून ती व्यक्ती एक ऍडल्ट मॉडेलिंग करणारी व्यक्ती आहे हे लक्षात आले. कंपनी जगभरातील १२०० हॉस्पिटलशी आपले टायअप असल्याचा दावा करत असली तरी कंपनीचे कुठेही इंटरनेटवर म्हणावे असे अस्तित्व नव्हते.
कंपनीच्या मुख्य वेबसाईटवर संपर्कासाठीच्या लिंकवर क्लिक केले असता ती लिंक एका क्रिप्टोकरन्सीच्या स्पॅम लिंकवर रीडायरेक्ट होत होती. कंपनीकडे एवढा डेटा गोळा करणे आणि त्याचे एनलिसिस करणे यासाठी आवश्यक असलेली टीम कुठेही उपलब्ध नव्हती.
सपन देसाई क्लायंट प्रायव्हसीच्या नावाखाली कोणताही कच्चा डेटा द्यायला तयार नव्हता.
सगळे प्रकरण उघडकीस १८० वैज्ञानिकांचे लांसेटला पत्र:-
हे सगळे प्रकार उघडकीस आल्याने मोठा गहजब माजला. जगभरातील जवळजवळ १८० वैज्ञानिकांनी लांसेटला पत्र लिहून प्रबंधातील दाव्यांत सत्यतेचा अभाव दिसत असल्याचे सांगितले.
द लांसेट ने शेवटी तो खोटा प्रबंध मागे घेतला:-
त्या प्रबंधात सपन देसाईचे जे को-ऑथर होते त्यांनाही डेटा दाखवायला सपन देसाई याने नकार दिला. मग मात्र त्या तिन्ही ऑर्थरनी स्वताहून द लांसेटला सदर प्रबंध मागे घ्यायला सांगितला.
द लांसेट सारख्या प्रतिष्ठित जर्नलमध्ये खोट्या डेटा वर आधारित प्रबंध प्रकाशित होणे आणि तेही करोनासारख्या प्रचंड नाजूक विषयांवर / समयी असे होणे हे द लांसेटच्या २०० वर्षे कार्य करुन प्राप्त केलेल्या प्रतिष्ठेसाठी लांच्छनास्पद होते.
त्यामुळे लांसेटने सुद्धा प्रबंध मागे घेत डेटाच्या चौकशीसाठी एक समिती गठीत केली. याच सपन देसाईच्या सर्जीस्फिअर कंपनीने काही वर्षांपूर्वी एक मशीन तयार केल्याचा दावा करून त्यासाठी लोकांकडून पैसे गोळा केले होते. या मशीनच्या वापराने माणूस एव्हॅल्यूशनच्या सर्वोच्च बिंदूवर पोचेल असा तो दावा होता. पण हे मशीन कधीही अस्तित्वात आलेच नाही.
NEJM जर्नल ने ही प्रबंध मागे घेतला:-
एवढेच नाही तर NEJM या दुसऱ्या प्रतिष्ठित आणि लांसेटहुन ही अधिक इम्पॅक्ट फॅक्टर असलेल्या जर्नल मध्ये 1 मेला याच लोकांचा आणि सर्जीस्फिअरच्याच डेटा वर आधारित असलेला एक प्रबंध प्रकाशित झाला होता, हा प्रबंधही NEJM ने मागे घेतल्याचे घोषित केले.
NEJM देखील २०० वर्षे जुने प्रतिष्ठित जर्नल असल्याने त्यांच्यासाठीही असे करावे लागणे ही मोठी नामुष्कीची बाब होती.
WHO झोपेतून जागी झाली:-
दरम्यान हंगामा चित्रपटात इकडूनही आणि तिकडूनही मार खाणाऱ्या राजपाल यादव सारखी अवस्था झालेल्या *WHO ला नव्याने उपरती होऊन त्यांनी हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या ट्रायल्स पुन्हा एकदा सुरू करण्याचे जाहीर केले.
या प्रकरणातील तीन भारतीय खोटारड्या संशोधकांबद्धल:-
या प्रकरणात तीन भारतीय वंशाचे लोक सामील आहेत म्हणून आपण लाज बाळगण्याचे काही कारण नाही. ते लोक भारतीय नागरिक नाहीत, आणि त्यातही, त्यातील दोन जणांनी स्वतःच प्रबंध मागे घेऊन डेटाच्या चौकशीची मागणी केली आहे.
भारतीय ICMR हिरो ठरला:-
पण या सगळ्या धुमश्चक्रीत खरा हिरो ठरले ते आपले ICMR.!! सगळे जग आणि अगदी WHO ने सुद्धा विरुद्ध भूमिका घेतलेली असताना ICMR ने “मानियेलें नाही बहुमता” या तत्वाशी प्रामाणिक राहून स्वतःच्या रिसर्चवर विश्वास कायम ठेवून आपल्या मार्गदर्शक तत्वांचा ठामपणे पाठपुरावा केला ही अत्यंत हिंमतीची, आत्मविश्वासाची आणि म्हणूनच आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट होय.
भारतीय ICMR च्या आत्मविश्वास पुर्ण आणि सत्य जगाला ठणकावून सांगण्याचा खुप दुरगामी व सकारात्मक फायदा भविष्यात आपल्या देशाला होणार आहे.