न्यायवैद्यकीय शवचिकित्सा म्हणजेच पोष्टमार्टेम Postmortem in Marathi.
गुन्हेगारी हा एक सामाजिक रोग आहे. रोगमुक्त समाज हे वैद्यकीय व्यवसायाचे अंतिम लक्ष असून या ध्येयपूर्तीसाठी प्रयत्नशील व सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. रोग्याचे उपचार करणे आणि न्यायवैद्यकीय कामकाजाद्वारे गुन्हा अन्वेषण व न्यायदान प्रक्रियेत मदत करणे या दोन्ही गोष्टींचा मूळ उद्देश आजार व गुन्हेगारीसारख्या दुष्प्रवृत्तीपासून समाजाचे रक्षण करणे हाच आहे.
याच कारणास्तव न्यायवैद्यकीय शवचिकित्सा हा गुन्हा अन्वेषण व न्यायदान प्रक्रियेतील अत्यंत महत्वाचा दुवा ठरतो. चिकित्सालयीन कामकाज व प्रशासकीय कामाबरोबर न्यायवैद्यकीय शवचिकित्सा करणे हा वैद्यकीय अधिका-यांच्या दैनंदिन कामाचा महत्वाचा व अनिवार्य भाग आहे.
खून, आत्महत्या, अपघात, विषबाधा व संशयास्पद परिस्थितीतील मृत्यू दवाखान्यात दाखल झाल्यानंतर २४ तासाच्या आत मृत्यु झालेल्या प्रकरणात न्यायवैद्यकीय अवचिकित्सा अनिवार्य ठरते.
त्याचप्रमाणे बधिरावस्था व शल्यक्रियेदरम्यान अथवा पश्चात्य मृत्यू प्रकरणात देखील न्यायवैद्यकीय शवचिकित्सा करणे क्रमप्राप्त ठरते. सर्वसाधारणपणे अशा प्रकरणात विनंती पत्र व पंचनाम्यासह पोलीसांमार्फत मृतदेह शवचिकित्सेसाठी आणले जातात.
परंतु आरोपी किंवा कैदी मृत्यू पावल्यास अथवा पोलिस गोळीबार मृत्यू प्रकरणी दंडाधिका-यामार्फत मृतदेह शवचिकित्सेसाठी आपले जातात.
अनुक्रमणिका
पोष्टमार्टेम चे उदिष्टे Use of Postmortem in Marathi
- मृत व्यक्तीची ओळख पटविणे.
- मृत्यूचे कारण ठरविणे.
- मृत्यूची वेळ ठरविणे.
- मृत्यूचा प्रकार ठरविणे ( खून , आत्महत्या , अपघात )
- अर्भक / नवजात शिशु मृत्यू प्रकरणात जीवन क्षमता ठरविणे.
न्यायवैद्यकीय शवचिकित्सा महत्वाच्या बाबी
- शवचिकित्सा नोंदणीकृत अनुभवी वैद्यकीय अधिका-यांनी करावी.
- शवचिकित्सा काटेकोर व संपूर्ण असावी.
- सर्व पुराव्याच्या गोष्टी जपून ठेवाव्यात.
- सुस्पष्ट, सविस्तर अहवाल लिहावा.
न्यायवैद्यकीय शवचिकित्सा चे नियम
- अधिकार पत्रांशिवाय ( उदा . पोलिसांचे विनंती पत्र , पंचनामा व शवफॉर्म ) शवचिकित्सा न करणे.
- शवचिकित्सेपूर्वी मयताची ओळख पटविणे आवश्यक.
- पंचनामा अपूर्ण वा चूक असल्यास दंडाधिका-यांमार्फत दुसरा पंचनामा करुन घेणे.
- आवश्यक वाटल्यास / पोलिसांनी विनंती केल्यास घटना स्थळास भेट देणे.
- मृत व्यक्ती उपचारासाठी एखाद्या रुग्णालयात दाखल झालेली असल्यास त्या कागदपत्रांची पाहणी करणे.
- आरोपी / कैदी मृत्यू प्रकरणात मृतदेहांची सविस्तर रंगीत छायाचित्रे काढण्यास पोलिसांना लेखी सांगणे.
- शवचिकित्से दरम्यान अनधिकृत व्यक्तिना / आगंतुकांना शवगृहात प्रवेश न देणे.
- शवचिकित्सा दिवसा प्रकाशात करणे.
- शवचिकित्सेस विलंब न लावता मृतांच्या नातेवाईकांशी सभ्यपणे व आपुलकीने बोलणे.
प्रत्यक्ष शवचिकित्सा
- अ ) बाहय परिक्षण :
- मृतदेहाचे संपूर्ण अवलोकन. जखमा, महत्वाच्या रोगांची लक्षणे, श्वासाबरोबरच्या खुणा, विषबाधेची लक्षणे इ. विशेषत्वाने नोंद केली जाते.
- ब ) अंतर्परिक्षण :
- छाती , पोट व कवटीच्या पोकळयातील सर्व अवयवांचे व्यवस्थित परिक्षण व नोंदी.
- क ) शवचिकित्सेनंतर मृतदेह / कपडे / व्हिसेरा / पुराव्याच्या इतर वस्तू अधिकृत पोलिसास देऊन लेखी पावती घ्यावी.
- ड ) शवचिकित्सेनंतर ४८ तासाचे आत शवचिकित्सा अहवाल कार्यालयात नोंदीसह जमा करणे , दस्तऐवज गोपनीय व सुरक्षित ठेवणे.
मृत्यू म्हणजे काय ?
मृत्यू हा जीवनाचा शेवट आहे. वैद्यकीय शास्त्रानुसार मृत्यू म्हणजे श्वसनक्रिया, हृदयक्रिया व मेंदूचे कार्य या तीन अती आवश्यक क्रिया बंद पडणे. यापैकी काही आधी किंवा लगेच, नंतर बंद पडते. हृदय व श्वसनक्रिया हया परस्परावलंबी असतात. त्यामुळे एक बंद झाली की लगेच दुसरीही बंद पडते. यानंतर २ ते ३ मिनिटात मेंदू निष्क्रीय होतो व जीवन संपते.
मृत्यूचे निदान
- दृदयक्रिया –
- नाडी तपासणी, गळयाच्या व मनगटाच्या जागी तपासतात. तसेच दृदयावर (डाव्या छातीवर) हात ठेवल्यास हृदयाचे ठोके जाणवतात. तसेच स्टेस्थोस्कोपद्वारे सुध्दा हृदयाचे ठोके तपासता येतात. मृत व्यक्तीमध्ये नाडी व दृदयाचे ठोके जाणवत नाही.
- श्वसनक्रिया –
- श्वसन छातीच्या हालचालीवरुन कळते. स्टेथोस्कोपने सुध्दा श्वसनाचे आवाज तपासता येतात. मृत व्यक्तीमध्ये श्वसनक्रिया बंद पडते.
- मेंदूचे कार्य –
- मेंदू मृत झाल्याची महत्वाची खुण म्हणजे बाहुल्या विस्फारणे व बॅटरीने प्रकाश टाकूनही त्या आकुंचित न होणे. त्याशिवाय इतर प्रतीक्षिप्त क्रिया सुध्दा बंद पडतात. याशिवाय स्नायू शिथिल पडणे, शरीराचे तापमान थंडावणे व नंतर शरीर कडक व ताठर होणे ह्या टप्याटप्याने होतात.